SAHYADRI HOSPITAL
blog post

वंध्यत्वाची प्रमुख कारणे

By Dr. Supriya Puranik

भारतामध्ये वंध्यत्वाचे(infertility in India) प्रमाण हे चिंताजनकरित्या वाढत चालले असून फक्त शहरीभागापुरते सीमित नसून ग्रामीण भागातही दिसून येत आहे. वंध्यत्वामुळे सामाजिक व भावनिक दुष्परिणाम दिसून येतात आणि जोडप्यांमध्ये नैराश्य वाढते. वंध्यत्व(Infertility) एक अशी वैद्यकीय परिस्थिती आहे,ज्यामध्ये साधारणत: एक वर्षापासून असुरक्षित लैंगिक संबंध असूनही जोडप्यांना गर्भधारणेमध्ये असमर्थता दिसून येते. ही फक्त स्त्रियांशी निगडीत समस्या नसून पुरूषांमध्येही वंध्यत्वाचे प्रमाण तेवढेच आहे. मात्र वंध्यत्वाचे निदान होणे हा जगाचा अंत नाही.आधुनिक शास्त्रातील प्रगतीमुळे नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्याआधी वंध्यत्व होण्याची प्रमुख कारणे(main causes of infertility) जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ती पुढीलप्रमाणे आहेत.

1. उशिरा अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न - उशिरा विवाह आणि आपल्या करिअरला प्राधान्य देण्याचा नवा कल दिसून येत असल्याने अनेक जोडपे उशिरा अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करतात. वयाच्या 30 वर्षापर्यंत गरोदर राहण्यासाठी सर्वोत्तम काळ असतो. परंतु हा काळ एकदा ओलांडला की महिलांमधील बीजांडे तयार होण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे 30 वयानंतर मूल होऊ देण्याचा निर्णय घेण्याची इच्छा असल्यास त्यापूर्वी चाचणी करून घ्यावी. त्यामध्ये महिलांनी बीजांड्यांचा साठा व पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू यांचा समावेश आहे.

2. दूषित द्रव्यपदार्थ - खते व किटकनाशके यांसारखी रसायने आपल्या अंत:स्त्रावी प्रणालीला (endocrine system) त्रासदायक ठरू शकतात. ही रसायने मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणी , अन्न आणि आपल्या श्वाकसाद्वारे आपल्या शरीरात जातात. रसायनांशी प्रमाणाबाहेर संपर्क आल्यास बीजांडांच्या कमकुवत क्षमतेसह होणार्याा बाळावर परिणाम होऊ शकतो.

3. जीवनशैलीतील बदल - माणसाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगली जीवनशैली हा घटक महत्वाचा ठरतो. तरुणांमध्ये धूम्रपान व मद्यपानाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी पुरुषांच्या पुनरुत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होत आहे. त्यामध्ये शुक्राणूंची गतिशीलता व गुणवत्ता कमी होणे, जनुकीय घटकांमध्ये बिघाड व पुनरुत्पादनाचे प्रमाण कमी होणे ही शक्यता असते. महिलांमध्ये बीजांडांचा गुणवत्ता व संख्या कमी होऊ शकते. याशिवाय व्यायामाचा अभाव व अपुरी झोप हे दोन घटक जोखमीचे ठरत आहेत.

4.आहार-आपल्या आहारामध्ये गहू आणि तांदुळासारख्या कर्बोदकांचा समावेश असल्यामुळे शरीरातील रक्त शर्करेचे प्रमाण वेगाने वाढते व तितक्याच गतीने खाली येेते. यामुळे पीसीओडी (PCOD)किंवा लठ्ठपणा यांची जोखीम वाढते व वंध्यत्वाचा धोका बळावू शकतो. आपल्याला या साध्या कर्बोदकांकडून संपूर्ण धान्यासारख्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटसकडे जाणे महत्त्वाचे आहे.

5.जागरूकतेचा अभाव- पुरेशी माहिती नसतानाही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक संबंध होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एपीडीडायमल ऑरकीटीस सारख्या संसर्गाचा धोका पुरूषांमध्ये वाढत चालला आहे तर महिलांमध्ये ओटीपोटाचा दाह व बीजनलिकेमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका बळावतो.

Blog Admin

By Dr. Supriya Puranik
(OBGY & Infertility Consultant) at Sahyadri Speciality Hospital Nagar Road, Pune
Contact: 8806252525 Email - ask@sahyadrihospitals.com