Home > Blogs > Neurosurgery > सचेतन मेंदूशल्यक्रियेचा एक सुहृदय अनुभव

सचेतन मेंदूशल्यक्रियेचा एक सुहृदय अनुभव

S. Y. B.Com. चा शेवटचा पेपर देऊन मी रमत-गमत घरी निघालो होतो. CA ची तयारी करावी की आणखीन कुठला क्लास लावावा या विचारात निघालो होतो. ऊन चांगलाच तापल होत. एवढ्यात, नितीन !!! अशी सागरची हाक ऐकू आली आणि मी वळलो तर पोटात कससंच व्हायला लागल, अचानक पणे शरीरावरचा ताबा सुटायला लागला , डोळ्यावर अंधारी आली ….पळत येणाऱ्या सागरचा चेहरा मला शेवटचा दिसला . त्यानंतर मी डोळे उघडले तेव्हा मी आमचे फॅमिली फिजीशियन डॉ देशपांडे यांच्या दवाखान्यात होतो.

सदानकदा हसतमुख असणारे डॉक्टर आज गंभीर दिसत होते. बाबांशी काहीतरी गुफ्तगूं केल्यावर, चेहऱ्यावर उसनं हसू आणत, ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, “चॅम्प ! …. एम.आर.आय. करावा लागेल आपल्याला ..”

एम.आर.आय. घेऊन आम्हाला डॉ. देशपांडेंनी एका मोठ्या हॉस्पिटल मधल्या न्यूरोसर्जन ला भेटायला सांगितले. एव्हाना मला एवढे कळले होते की मला बहुतेक तरी फिट/आकडी आली होती आणि एम.आर.आय. चा रिपोर्ट बघून आईबाबा आणि डॉ देशपांडे दोघेही जरा भांबावलेले दिसत होते. न्यूरोसर्जन आता काय म्हणतील हा विचार करून माझ्याही पोटात गोळा आलेला होता.

हे न्यूरोसर्जनही तसे हसतमुख होते आणि डोळ्यात मिश्किल झाक होती. गमत्या स्वभाव नसेल तर बहुतेक एमबीबीएस ला आजकाल ऍडमिशनच देत नसावेत, असे काहीसे उलट सुलट विचार माझ्या मनात येत होते.

त्यांनी माझी खूप आस्थेनी विचारपूस केली. माझ्या आवडी निवडी विचारल्या. मला लिहून दाखवायला सांगितले. माझं वेडवाकडं येणारं हस्ताक्षर पाहून मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. खूप वाईट वाटलं. आत्ता परवापर्यंत तर मी पेपर सुद्धा किती सुंदर अक्षरात लिहिला होता. त्यांनी तपासताना मला उजव्या हाताची मुठ सुद्धा जरा कमकुवत वाटली आणि बोलण्यातही थोडा तोतरे पणा जाणवला, मी कन्फ्युज मुद्रेने डॉ कडे पाहिले. ते मन लावून माझा एम.आर.आय. पहात होते. तब्बल अर्धा तास हे सगळं झाल्यावर त्यांनी शांत आवाजात बोलायला सुरुवात केली.

“हे बघ , नितीन !” “तुझी लक्षणं आणि एम.आर.आय. बघून मला असं लक्षात येतंय की , तुझ्या मेंदूमध्ये एक गाठ उत्पन्न झाली आहे. साधारणतः लिंबाच्या आकाराची ही गाठ तुझ्या मेंदूच्या अश्या भागात तयार झाली आहे की ,जिथून तुझ्या उजव्या हाताचे आणि तोंडाचे नियंत्रण होते. “

आम्ही कानात प्राण आणून त्यांचे म्हणणं ऐकत होतो.

ते पुढं म्हणाले, ” ढोबळमानाने सांगायचं तर मेंदू एक स्विच बोर्ड सारखा आहे. स्विच बोर्ड वरच प्रत्येक बटण जसं एका विशिष्ट यंत्राला (उदा पंखा, ट्यूब लाईट इत्यादी) नियंत्रित करतं तसं मेंदूचा प्रत्येक भाग हा एखाद्या शरीराच्या बाहेरच्या किंवा आतल्या विशिष्ट अवयवाला नियंत्रित करत असतो.”

” तुझी ही गाठ ज्या मेंदूच्या डाव्या भागात उत्पन्न झाली आहे त्याच्या दाबामुळे , तुला हाताच्या क्लिष्ट हालचालींमध्ये आणि स्पष्ट बोलण्यामध्ये अडचण येत आहे. त्याशिवाय मेंदूच्या इलेक्ट्रिक संदेश वहनांमध्ये अडथळा आणल्यामुळे त्याच शॉर्ट सर्किट सारखं होऊन तुला अपस्माराचा (फिट) चा झटका आला होता. ” ” ते सगळं ठीक आहे हो, पण ही गाठ कॅन्सरची तर नाही ना?” न राहवून शेवटी माझ्या बाबांनी चाचरत विचारून टाकलं.

हा प्रश्न माझ्याही मनात केव्हापासून चालू होता. उत्तर ऐकण्या पूर्वी माझ्या छातीतली धडधड कोणालाही ऐकू जाईल अशी वाढली होती. पण त्यांच्या चेहऱ्यावरच फिक्स असलेलं हसू मला थोडं आशावादी वाटत होतं.

एक खोल श्वास घेऊन ते पुढं म्हणाले, “ह्या मेंदूच्या गाठींना ग्लायोमा (Glioma) अस म्हणतात. गाठीच्या वाढण्याच्या वेगावरून यांना चार भागात विभागले जाते. पहिल्या दोन ग्रेडना साध्या आणि नंतरच्या तीन अन् चार ग्रेडला कॅन्सर सदृश समजलं जातं. तुझ्या एम.आर.आय. च्या चित्रावरून मला ही एक किंवा दोन प्रवर्गातील गाठ वाटते. “

हे ऐकल्यावर आम्ही सगळ्यांनी एकसाथ निःश्वास टाकला. पण ना थांबता डॉ पुढं म्हणाले, “पण असं असलं तरी ह्या सामान्य गाठीचे रूपांतर पुढे चालून कॅन्सर वर्गातल्या गाठीमध्ये होऊ शकते. त्यामुळे निदर्शनास आल्यानंतर, यावर उपचार करणे आवश्यक ठरते”

“बरं, मग लगेच एखादी गोळी देऊन टाका की यावरची, महाग असली तरी चालेल” इति आई.

डॉ आई कडे बघत म्हणाले, “नाही मावशी, सध्यातरी ह्या आजारावर कोणतीही गोळी किंवा इंजेक्शन नाहीये. ट्यूमर हा एक मेकॅनिकल अडथळा आहे आणि ऑपरेशन करून तो काढणे हा इलाजाचा खूप महत्वाचा भाग आहे. ट्युमर ग्रेड च्या रिपोर्ट वरून पुढे रेडिएशन आणि केमोथेरपी च्या गोळ्या मात्र कधी कधी जरूर वापराव्या लागतात.”

ऑपरेशन म्हणताच माझ्या पोटातल्या खाली उतरलेल्या गोळ्याने पुनः उचल खाल्ली. कानाच्या पाळ्या गरम भासू लागल्या. “हे..हे ऑपरेशन मग कसं करतात ” कोरड्या पडत चाललेल्या कंठाने मी विचारले.

“तुझ्या डाव्या बाजूच्या कवटीचा छोटा भाग काढून , मेंदूचं आवरण उघडून आधी तो टयुमर शोधून मग एका मोठ्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने , नॉर्मल मेंदुपासून त्याला हळूवार पणे वेगळं केलं जाईल. संपूर्ण गाठ निघाल्यावर रिव्हर्स गियर मध्ये येत कवटीचा आणि चामडीचा छेद बंद केला जाईल.” डॉक्टरांनी सराईत पणें एका दमात सांगून टाकले. वारंवार हेच बोलून त्यांना हे डायलॉग्ज बहुधा पाठ झाले असावेत.

” पण मला पूर्ण भूल देणार ना? आणि मुख्य म्हणजे दुखणार नाहीना फार?” मी चटकन विचारले. ” भूल संपल्यावर लगेच शुध्दीवर येईल ना तो ? ” बाबांनी काळजीच्या सुरात विचारलं.

जणूकाही हे सगळे प्रश्न अपेक्षित आहेत अशा सुरात डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. “तुझ्या केस मध्ये आपण थोड वेगळं करणार आहोत. तू ऑपरेशन करताना संपूर्ण शुध्दीवर असशील” असशील, आपण गप्पा मारू आणि तू तुला सांगितलेल्या हालचाली आम्हाला करून दाखवशील “ “ असं करण कसं शक्य आहे ?” मी भीती आणि आश्चर्य मिश्रित स्वर काढला. “सांगतो”

“ या प्रकाराला ‘AWAKE CRANIOTOMY’ किंवा ‘सचेतन अवस्थेतील मेंदूशल्यक्रिया’ असं म्हणतात. जसं तुम्हाला माहिती असेल की शरीराच्या सगळ्या संवेदना (उदाहरणार्थ दुखणं , स्पर्श, चटका इत्यादी ) मेंदूकडे प्रथम संग्रहित होतात आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. पण….पण मेंदू स्वतः मात्र अलिप्त असतो. त्याला स्वतःच्या काहीच संवेदना नसतात. मेंदूला स्पर्श केलेला , टोचलेलं काहीच जाणवत नाही. पण मेंदू-भोवतालच्या भागांना मात्र संपूर्ण संवेदना असतात. डोक्याची त्वचा , कवटीचं हाड आणि आवरण (DURA MATER) ह्या मेंदू वरच्या लेयर्स ना आपण स्थानिक भूल (लोकल ऍनेस्थेशिया ) देऊन वेदना विरहीत करू शकतो. त्यामुळॆ मेंदूपर्यंत पोहोचताना दुखत नाही आणि मेंदूला तर ऑपरेशन केलेलं अजिबातच जाणवतच नाही ! “

“पण याचा फायदा काय ?” इति बाबा.

“आहेना. बऱ्याचदा हे ट्युमर दिसायला मेंदूपेक्षा वेगळे नसतात. ट्युमर आणि मेंदूचा नॉर्मल भाग यामध्ये गफलत होण्याची शक्यता असते किंवा ट्युमर काढताना नॉर्मल भागाला इजा होण्याची भीती असते. आता जसं आपल्याच केस मध्ये बघा, त्याच्या उजव्या हाताला आणि वाचा नियंत्रित करणाऱ्या भागामध्ये ट्युमर आहे. ऑपरेशन करताना मेंदू एक्सपोझ केल्यावर आम्ही एका लेखणी सदृश छोट्या स्टिम्युलेटरने मेंदूच्या नॉर्मल भागाला उद्दीपित करू. जर तो भाग त्याच्या बोलण्याला किंवा हाताला किंवा पायाला नियंत्रित करणारा भाग असेल तर त्या भागाची हालचाल तात्पुरती बंद पडेल. मग आम्ही त्या भागाला लेबल लावून त्याच्यापासून दूर जाऊन ट्युमर काढण्याचं काम करू. हे काहीसं “रिअल टाइम टेस्टिंग” सारखं असतं. संपूर्ण बेशुद्ध असलेल्या पेशंट मध्ये जर ट्युमर काढताना नॉर्मल भागाला इजा झाली असेल तर ती पेशंट पूर्ण शुद्धीवर आल्याशिवाय कळण्याचा मार्गच नाही. शिवाय काही नॉर्मल भागाची हालचाल बंद झाल्यास त्यास पुनः रिव्हर्स करणेही शक्य नसते. त्यामुळे लगेचच धोका समजून घेऊन आपली ट्युमर पुरती बॉऊण्डरी आखून घेणे कधीही शहाणपणचे ठरते. या शिवाय भुलीच्या औषधांचा फार वापर झाला नसल्याने , पेशंटची रिकव्हरी पण फार छान आणि आनंददायी असते.”

“ह्या टेक्निक मूळे ब्रेन सर्जरी सारख्या सगळ्यात क्लिष्ट ऑपरेशन मधली आपण सेफ्टी वाढवू शकतो आणि ट्युमर सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात काढता येतो “ डॉक्टरांनी थोड्या अभ्यासू मुद्रेने हे सगळं सांगितलं

“मग तुम्ही सगळ्याच सर्जरी अश्याप्रकारे करता का ?” माझ्या आईची शंका … “नाही, कितीही इच्छा असली तरी सगळ्या ऑपरेशन मध्ये ही युक्ती वापरता येण्याजोगी नसते. कारण काही वेळेला अतिमोठ्या ट्युमर साठी कवटीचा मोठा छेद घ्यावा लागतो किंवा ऑपरेशन करतानाची पेशंटची पोजिशन आरामदायी नसते किंवा कधी कधी खूप रक्तस्त्राव अपेक्षित असतो आणि अर्थातच इमरजंसी केसेस मध्ये मेंदूवर खूप सूज असते , तेव्हाही ह्या टेक्निक चा अवलंब करता नाही “ एवढं बोलून डॉक्टरांनी तपासण्या आणि प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतलं.

आता मात्र ह्या नवीन प्रकाराबद्दल मला उत्सुकता वाटायला लागली. यथावकाश सगळ्या रक्त तपासण्या ,एक्सरे वगैरे करून आम्ही भूलतज्ज्ञांच्या टीमला भेटलो. त्यांनी माझी कसून तपासणी केली आणि मुख्य म्हणजे खूप अवांतर गप्पा मारल्या. त्यांच्या सोबतच्या एका सिस्टरने तर मला आवडणाऱ्या गाण्यांची एक लिस्ट बनवून घेतली. त्यांनी मला सांगितलं की एक अतिशय बारीक सुई , जी तुला मच्छर चावल्यासारखी वाटेल, तुला पहिल्यांदा कपाळावरती टोचली जाईल. ते तुझं पाहिलं आणि शेवटचं दुखणं असेल. कारण त्या सुईतुन माझ्या कपाळाला आणि कवटीला भूल दिली जाईल. त्यानंतर काही दुखणार नाही . फक्त काहीतरी आवाज मात्र येतील आणि आपल्या गप्पागोष्टी सुरु राहतील. हे दोघेही भूलतज्ज्ञ सर आणि मॅडम मला फार चांगले वाटले. एकंदरीत मोठ्या हॉस्पिटलातले तज्ज्ञ डॉ खडूस असतात असा माझा ग्रह थोडा आता कमी झाला होता.

“काय रे ? तुझं टकुरें उघडल्यावर त्यांना तुझा मेंदूच सापडला नाही तर ? “ सागर , माझ्या मित्राने काहीतरी भंकस विनोद केला आणि स्वतःच हसत बसला. ऑपरेशन च्या आदल्या रात्री ऑस्पिटल मध्ये माझ्यासोबत झोपायला तो आला होता. त्याच्या जोकचं नाही पण माझ्या मनावरचा ताण कमी करण्याच्या ह्या त्याच्या माफक प्रयत्नांचं मात्र मला जाम हसू आलं. आम्ही दोघंही हसत बसलो. आमच्या वॉर्ड मध्ये आदल्या दिवशी किंवा आधी, माझ्यासारखं ऑपरेशन झालेले अजून २-३ जण होते. डोक्याला चिटकवलेली छोटी पट्टी सोडली तर सगळे व्यवस्थित दिसत होते. टक्कल वगैरे पण केलेलं नव्हतं कुणाचं. ते बघून मला जरा हायसं वाटलं. माझ्या स्टायलिश हेअरकट चा हे डॉ सत्यानाश करणार आणि मला त्यांच्या स्वतः सारखा टकलं करणार ही धास्ती माझ्या मनात खरंतर जास्त होती. त्यात तो सागर स्नॅपचॅट वर मी टकलू झालयावर कुठला विग बरा दिसेल ते मला दाखवत बसला होता.

दुसऱ्यादिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं . ते थिएटर बघून, एखाद्या SCI -FI इंग्लिश पिक्चर मधल्या सेट वर तर आपण आलो नाहीना असं मला वाटू लागलं. चित्रविचित्र मॉनिटर्स , त्यावरचे रंगीत आकडे, कसलेतरी मोठाले मशिन्स बघून मला थोडी उत्सुकता मिश्रित भीती वाटली. पण बॅकग्राऊंड मध्ये माझं आवडत गाणं सुरु होतं. माझ्याकडंन रंगीत तालीम करून घेतली होती तसे सगळे जण आले. मला एका टेबल वर झोपवलं आणि आधी सांगितल्याप्रमाणे डोक्याच्या चामडीला भूल दिली. न्यूरोसर्जन माझ्या डोक्याशी उभे राहून अँटिसेप्टिक औषधे माझ्या केसांना लावत होते.

“माझे सगळे केस काढणार का ?” जरा घाबरतच मी विचारलं. “हट रे ! सगळे केस बिस काही काढणार नाही तुझे फक्त ऑपरेशनच्या जागे भोवतीची छोटीशी स्ट्रीप काढणार. अरे माझ्याशिवाय डोक्यावरच्या केसांची किंमत कुणाला कळणार “ आपल्या अतिविरळ केसांवरील कॅप सरळ करत ते न्यूरोसर्जन हसत हसत म्हणाले.

“हे हे हे !” मलाही खुद्कन हसू आलं . पण आम्ही दोघ सोडलं तर इतर फार कुणी हसलं नाही. सगळेजण एकतर फार टेन्शन मध्ये असावेत किंवा बहुतेक या डॉक्टरांचा हा जुना ठराविक घासलेला विनोद असावा.

पण मला हळू हळू थोडी झोप लागली. एक छोटी डुलकी काढल्यावर मला जाग आली, तर ऍनेस्थेटीस्ट डॉ माझ्याशी लगेच बोलायला आले. ऑपरेशन सुरळीत चालू होतं . आमच्या गप्पाही रंगात आल्या होत्या. सध्याचे चित्रपट , क्रिकेट , व्हाट्सअँप वरचे विनोद अश्या बऱ्याच विषयावर आम्ही बोलत होतो. मध्ये मध्ये ते मला उजव्या हाताची /पायाची हालचाल कर, आकडे सरळ आणि उलटे मोजून दाखव , काही लिहिलेलं वाचून दाखव अस पण करायला लावत होते. न्यूरोसर्जनही मध्ये मध्ये आमच्या बोलण्यात सहभागी होत होते. माझ्या आवडीची गाणी ब्लूटूथ स्पीकर वर छान सुरु होती.

थोड्या वेळाने ते न्यूरोसर्जन मला काही दुखत नाहीये ना, झाल हं , अंग आखडल का वगैरे प्रश्न विचारायला लागले. मला काही त्रास होतच नव्हता मुळात आणि कंटाळाही नव्हता आला. मी नाही म्हटल्यावर म्हणाले “ठीक आहे मग, ओक्के! चल उठून बस आणि हळू हळू ICU बेड वर स्वतःच शिफ्ट हो “

“अर्रेचा ! झालं की काय ?” “ऑपरेशन कामयाब झालं का डॉ ?” मी विचारलं. “हो रे ! अगदी छान झालं . कामयाब पण झालं. फार हिंदी पिक्चर बघतो रे तू “ डॉ हसत हसत म्हणाले. यावेळेला माझ्यासकट सगळे जण हसले.

प्रसन्न चेहेऱ्याने मी बाहेर गेलो , आई-बाबाना भेटलो. मला आनंदी पाहूनही त्यांच्या डोळ्यात सारखं पाणी होतं. मन एकदम हलकं झाल होत. अचानक सगळा ताण नाहीसा झालेला होता. त्यांच्याशी जुजबी बोलून मला ICU कडे नेलं , जाता जाता माझा मित्र सागर दात विचकत हसताना मला दिसला. शर्टाच्या बाहीने घाम पुसण्याचा अविर्भाव करत होता तो. पण तेव्हाही माझ्या लक्षात आलं, तो घाम नाही …. डोळे पुसत होता.

त्या रात्री ICU मध्ये ठेऊन मला मग वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले. ऑपरेशन नंतरचा माझा CT स्कॅनचा रिपोर्ट छान आला होता. मी सगळ्या गोष्टी रेगुलर करत होतो. डाव्या डोळयांवर थोडीशी सूज आलेली सोडली तर एकंदर सगळं आलबेल होतं.

दोन तीन दिवसानंतर माझी सुट्टी झाली , आमची गाडी गेट वर आली होती , सगळ्या स्टाफचा आम्ही निरोप घेतला. चारच दिवस झाले असले तरी तिथल्या सिस्टर, वॉर्डबॉयशी आमचे ऋणानुबंध फार जुने झाल्यासारखे वाटले. आम्ही निघणार तेवढ्यात हॉस्पिटलच्या कस्टमर केयर वाल्या मॅडम घाईघाईत माझ्या कडे काही कागद घेऊन आल्या आणि म्हणाल्या प्लीज हा अभिप्रायाचा छोटासा फॉर्म भरून द्या ना.

मी तो फॉर्म लगेच भरून दिला आणि तो वाचता-वाचता त्या अभावितपणे मला म्हणाल्या

“वाह ! कित्ती सुंदर हस्ताक्षर आहे तुमचं “…..

(सत्यघटनेवर आधारित)

Have queries or concern ?

    About Author

    Dr. Mangesh Udar DNB (Internal Medicine) DNB (Neurology

    Dr. Sameer Futane

    Consultant Brain & Spine Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1178" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222