Home > Blogs > Neurology > कोविड दरम्यान व कोविड पश्‍चात मेंदूसंबंधी उद्भवणाऱ्या समस्या

कोविड दरम्यान व कोविड पश्‍चात मेंदूसंबंधी उद्भवणाऱ्या समस्या

कोविड दरम्यान व कोविड पश्‍चात मेंदूसंबंधी उद्भवणाऱ्या समस्या

कोविड प्रामुख्याने श्‍वसन प्रणालीवर परिणाम करतो आणि फुफ्फुसांच्या विकारांना कारणीभूत ठरतो, याबाबत सगळ्यांमध्ये जागरूकता आता निर्माण झाली आहे. मात्र अनेक रूग्ण हे मेंदूूसंबंधी समस्या देखील घेऊन येतात.

कोविडमुळे मेंदू संबंधी होणारे मानसिक परिणाम

अनेक रूग्ण हे कोविडचा संसर्ग झाल्यानंतर घरात स्वत:चे विलगीकरण करतात किंवा त्यांच्यावर हॉस्पिटल किंवा अतिदक्षता विभागात उपचार होतात.ते बरे झाल्यावर त्यांना मेंदूशी संबंधित अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.त्यामध्ये प्रचंड थकवा,स्पष्ट विचार करण्यामध्ये असमर्थता (ब्रेन फॉग),दैनंदिन कामकाजात गती मंदावणे,झोप येणे,उर्जा किंवा उत्साहाचा अभाव यांचा समावेश आहे. अशा रूग्णांना विलगीकरण किंवा अतिदक्षता विभागातील उपचार आणि मानसिक कारणांमुळे असे होते आहे,असे सुरूवातीला वाटायचे.हे अंशत: खरे असले तरी कोविडमुळे देखील ही लक्षणे निर्माण होऊ शकतात.

म्हणूनच नैराश्य व चिंताग्रस्तपणा यावर उपचार करणे आवश्यक आहे.अशी स्थिती काही रूग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत राहू शकते,याला लॉंग कोविड असे म्हणतात. याशिवाय रूग्णांची काळजी घेणारे व उपचार करणार्‍यांनी देखील कुटुंबातील लोकांमध्ये कोविडचा अनुभव घेतलेला असतो आणि त्यांनीही दीर्घकाळ उपचार,आर्थिक,भावनिक ताण-तणावाचा अनुभव घेतलेला असतो .त्यामुळे नैराश्य व चिंताग्रस्तपणा त्यांच्यामध्येही आढळून येऊ शकतो.म्हणूनच ही स्थिती गांभीर्याने घेतली पाहिजे,कारण याचा जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.कोविड पश्‍चात या परिणामांवर उपचार म्हणजे कोविडवरील एकदंर उपचारांचाच एक महत्त्वाचा भाग आहे.

कोविड मुळे मेंदूवर होणारे परिणाम

असंख्य रूग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोक ही वैद्यकीय परिस्थिती आढळून आली आहे.याचा अर्थ रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.यातील बर्‍याच लोकांमध्ये चाचण्या केल्यानंतर समजते की,यांना कोविडचा संसर्ग झाला आहे.जरी पाश्‍चात्य देशात यावर सहमती नसेल तरी स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यासाठी कोविड हा एक जोखमीचा घटक आहे,असे समजायला वाव आहे.कुठलाही जोखमीचा घटक नसताना अनेक विशी-तिशीतले रूग्ण यांना स्ट्रोक आल्याचे आढळून आले आहे.यावर लवकर उपचार केल्यास रूग्ण बरे होण्यास मदत होते.

याशिवाय बर्‍याच रूग्णांमध्ये क्रॅनियल नर्व्ह पाल्सी ही स्थिती आढळून आली आहे. यामध्ये मेंदूतील नसांच्या कार्यावर विपरीत परिणाम झालेला असतो. चेहरा एका बाजूला वाकलेला दिसून येतो आणि चेहर्‍याच्या स्नायूंना एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना पक्षाघात होतो.कधीकधी डोळ्याच्या हालचालींसाठी मदत करणार्‍या स्नायूंवर देखील परिणाम होतो यामुळे दुहेरी दृष्टी,डोळ्याची उघडझाप करण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात आणि उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून कालावधी लागू शकतो.

कोविडमुळे आणखी एक उद्भवणारी समस्या म्हणजे गुलियन बारे सिंड्रोम (GB Syndrome). ज्यामध्ये रूग्णाच्या शरीराला पूर्णपणे पॅरालिसिस होऊ शकतो.त्यांना गिळण्यास अडचण येते आणि नळीद्वारे अन्न भरविण्याची वेळ येते.त्यातील काही जणांना व्हेंटीलेटरची गरज भासू शकते कारण,त्यांच्या श्‍वसनाच्या स्नायूंवर देखील विपरीत परिणाम झालेला असतो. अशा रूग्णांवर औषधांसह आक्रमकपणे उपचार करावे लागतात कारण,ही जीवघेणी स्थिती होऊ शकते. परंतु लवकर उपचार आणि अतिदक्षता विभागात काळजी यामुळे यातून बरेचशे रूग्ण बरे होऊ शकतात.

विशेषत: कोविडच्या पहिल्या लाटेत बर्‍याच रूग्णांना चव जाणे किंवा वास कमी झाल्याचा अनुभव आला. हे देखील मेंदू संबंधित नसांवर (ऑलफॅक्ट्री क्रॅनियल नर्व्ह) परिणाम झाल्यामुळे दिसून आले.मात्र ही स्थिती बरी होते.याला कोविडचे लक्षण म्हणून मानले जाते.

क्वचितच हा विषाणू मेंदूत शिरल्याचे आढळून येऊ शकते.कदाचित हा विषाणू ऑलफॅक्ट्री नर्व्ह मधून शिरला असण्याची शक्यता असते.ज्यामुळे स्मरणशक्ती जाणे किंवा भास होणे यासारखे परिणाम दिसून येतात.क्वचितच बेशुध्दी किंवा इतर मेंदूशी संबंधित आजार दिसून येतात.

मेंदूतील गुंतागुंतींवर उपचार

ब्रेनस्ट्रोक आल्यास त्यावर नेहमीच्या पध्दतीने उपचार केले जातात.मात्र कोविडच्या काळामध्ये अतिदक्षता विभागातील बेड व्यस्त असल्याने स्ट्रोक आलेल्या रूग्णांवर उपचार करणे मोठे आव्हान असते,कारण स्ट्रोकच्या उपचारांमध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असते.त्यामुळे कुठल्याही रूग्णाला ब्रेनस्ट्रोक आल्यास स्ट्रोकवर उपचार करणार्‍या रूग्णालयात तातडीने घेऊन जाणे महत्त्वाचे असते.

गुलियन बारे सिंड्रोमच्या बाबतीत रुग्णाला प्लाझ्मा फेरेसिस किंवा इम्युनोग्लोबिलिन या पध्दतीने उपचार केलेे जातात. (प्लाझ्मा फेरेसिस या प्रक्रियेमध्ये शरीरातील प्लाझ्मा किंवा द्रव हे पेशींपेक्षा वेगळे केले जाते आणि या पेशी पुन्हा रक्तप्रवाहात सोडल्या जातात.ऑटोइम्युन परिस्थितीत उपचारांमध्ये प्रतिपिंडे (antibodies)काढून टाकण्यासाठी विशेषत: ही प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया महाग मात्र अत्यंत प्रभावी असते.

क्रेनियल नर्व्ह पाल्सीच्या रुग्णांना उपचारासाठी स्टेरॉईडसचा छोटा कोर्स दिला जाऊ शकतो आणि बहुतांश जण यातून बरे होतात.

मेंदूशी संबंधित मानसिक समस्यांना समुपदेशन किंवा औषधांची गरज भासू शकते.बहुतांश रूग्ण यातून बरे होतात मात्र पूर्णपणे बरे व्हायला काही आठवडे किंवा महिने लागू शकतात.

म्युकरमायकॉसिसचे आव्हान

दुसर्‍या लाटेमध्ये म्युकरमायकॉसिसने एक मोठे आव्हान उभे केले आहे.याआधी अगदी थोडे रूग्ण आढळून यायचे.विशेषत:ज्यांना मधुमेह आहे पण उपचार झालेले नाहीत किंवा मुत्रपिंडामध्ये बिघाड झाला आहे किंवा ज्यांच्यावर इम्युनोसप्रेसिव्ह उपचार सुरू आहेत.अशांमध्ये हे आढळून यायचे मात्र,कोविडच्या दुसर्‍या लाटेत ही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे आणि यातील मृत्युचे प्रमाण देखील जास्त आहे.मात्र लवकर व वेळेवर उपचार केल्यास हे मृत्युचे प्रमाण कमी होऊ शकते.ज्यांना डोके दुखणे,चेहर्‍यावर वेदना होणे,सुन्नपणा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात.त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.निदान करण्यासाठी एमआरआय किंवा सीटी स्कॅन केला जातो.यातील अनेक रूग्णांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.त्यांना दीर्घकाळ अतिदक्षता विभागात स्टेरॉईडसद्वारे उपचार केलेेले असतात किंवा मधुमेहाशी संबंधित मुत्रपिंडाचे विकार (डायबेटिक केटोऍसिडॉसिस) सारखी स्थिती असते.

अनेकांच्या मताप्रमाणे औद्योगिक प्राणवायू देखील कारणीभूत आहे,मात्र हे खरे आहे की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.म्युकरमायकॉसिसच्या बाबतीत लवकर निदान व औेषधोपचार आणि गरज भासल्यास शस्त्रक्र्रिया केल्यास अनेक म्युकरमायकॉसिस रूग्णांना वाचविले जाऊ शकते. म्युकरमायकॉसिसच्या उपचारांमध्ये जागरूकता,वेळेवर निदान,स्टेरॉईडसचा कमी वापर आणि साखरेच्या पातळीवर काटेकोर नियंत्रण हे महत्त्वाचे ठरू शकते.

काळी बुरशीचा शरीरातील प्रसार हा नाकावाटे सुरू होतो.जर यावर लक्ष दिले गेले नाही तर डोळ्याच्या पोकळीत शिरू शकते.त्यानंतर रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकते.वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की त्याचा परिणाम मेंदूवर होतो.मेंदूवर परिणाम झाला तर रूग्ण उपचारांना कमी प्रतिसाद देतो.अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करण्यासाठी उशीर झालेला असू शकतो.त्यामुळेच ही काळी बुरशी डोळ्यांपर्यंत जाण्याआधी आक्रमकपणे उपचार करणे गरजेचे आहे.निष्क्रिय झालेल्या पेशी पूर्णपणे काढून टाकल्या जातात.यामुळे सुस्थितीत असलेल्या पेशींपर्यंत औषध पोहचू शकते आणि काळ्या बुरशीची वाढ थांबवू शकते.काही बाबतीत म्युकरमायकॉसिसने ग्रस्त चेहर्‍यावरील हाडे मोठ्या प्रमाणावर काढून टाकावी लागतात आणि यामुळे चेहर्‍यावर विकृती दिसून येऊ शकते.हे उपचार करत असताना अतिदक्षता विभागात इन्शुलिन व IV फ्ल्युईड द्वारे साखरेवर नियंत्रण आणले जाते.याशिवाय मधुमेहामुळे उद्भवणारा ऍसिडॉसिस (शरीराच्या द्रव्यांमध्ये अतिप्रमाणात ऍसिड असण्याची स्थिती) यावर उपचार देखील महत्त्वाचे असतात,ज्यामुळे काळ्या बुरशीची वाढ थांबू शकते.

About Author

Dr. Nasli R Ichaporia

Dr. Nasli R Ichaporia

Senior Consultant Neurologist & Director of Neurology Department, Nagar road
Contact: 8806252525
Email – ask@sahyadrihospitals.com

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Expert Doctors

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post