Home > Blogs > Internal Medicine > डेंगू

डेंग्यू: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, प्रतिबंध

सुखद पावसाळा सुरु होत असतांना डेंगू सारखे आजार देखील डोके वर काढून चिंता निर्माण करतात. गत वर्षांमध्ये क्वचित डेंग्यूचे रुग्ण दगावलेही असल्यामुळे दहशतीचे वातावरण दिसते. या विषयी माहितीच्या अभावामुळे भीती जास्त असल्याचे जाणवते. हा डेंगू आणि त्याविषयीचे समज – गैरसमज जाणून घेऊ. 

भारतामध्ये १९६३ साली कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) डेंगूची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरं, शहरं आणि ग्रामीण भागातही डँगूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. डेंगू हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल प्रकारचा आजार आहे (Dengue is a viral infection).

डेंगू आजारालाच डेंगी अथवा डेंग्यू चा ताप (Dengue Fever) असे सुद्धा संबोधतात. डेंग्यूचा विषाणू म्हणजेच व्हायरस हा एडिस इजिप्ती ह्या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो. म्हणजे डेंगू असलेल्या रुग्णाला चावलेला डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा डेंगूची लागण होते.

हे डास दिवस चवणारे असतात. ह्या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डासानी चावा घेतल्यानंतर डेंग्यूची लक्षणे साधारणतः पाच ते सात दिवसांमध्ये दिसू लागतात. डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप (हाय ग्रेड फिवर), डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे. ह्याव्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं, जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी दिसून येऊ शकतात. 

डेंगूची गंभीर स्वरूपाची लक्षणे पुढील प्रमाणे असतात: हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होणे व तो काळ्या विष्टेच्या स्वरूपात बाहेर पडणे, प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे. 

 

डेंगूच्या आजारात रक्तातील प्लेटलेट पेशी (रक्त गोठवण्यात मदत करणाऱ्या रक्त कणिका) कमी होत असतात हे सर्वज्ञात आहे. विशेषतः ताप गेल्यानंतर प्लेटलेट पेशी कमी होण्यास सुरुवात होते. साधारणतः चार ते पाच दिवसात पेशी वाढायला सुरुवात होते.

प्लेटलेट कमी होणे हेच एक डेंगू च्या तीव्रतेचे लक्षण नाही. बीपी कमी होणे, हात-पाय थंड पडणे, लघवी कमी होणे, किंवा पोटात दुखणे ही गंभीरतेची लक्षणे असतात.

प्लेटलेट वाढणे हे मुख्यत्वे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. 

प्लेटलेट पेशी वीस हजारापेक्षा कमी होत असल्यास ट्रान्सफ्यूस म्हणजे ब्लड बँकेतून मागवून रुग्णास चढवाव्या लागतात. प्लेटलेट पेशींची संख्या जास्त असूनही रक्त स्रावाची लक्षणे असल्यास डॉक्टर प्लेटलेट ट्रान्सफ्यूस करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्लेटलेट ट्रान्सफ्यूस करणे हा रक्तस्त्रावाचा धोका टाळण्याचा तात्पुरता उपाय आहे.

ट्रान्सफ्यूस केलेल्या पेशी देखील शरीरात नष्ट होत असतात त्यामुळे वारंवार प्लेटलेट चढवण्याची गरज सुद्धा भासू शकते. आजाराचा प्रभाव कमी होत जाऊन शरीर प्रकृतीत सुधारणा सुरु झाल्यावर प्लेटलेट आपोआप वाढतात.

पपईच्या पानांचा रस, किवीचे फळ किंवा इतर कुठलेही औषध दिल्याने फायदा होऊन प्लेटलेट वाढतीलच असे कुठलेही संशोधन झालेले नाही. 

डेंग्यूचा आजार शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतो. त्यातूनच गुंतागुंत होऊन तो गंभीर रूप घेऊ शकतो. अनियंत्रित प्रकारचा मधुमेह, हृदयविकार (heart disease), मूत्रपिंड अथवा यकृताचा आजार इत्यादींमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे किंवा पोषक तत्वांचा (उदा: जीवनसत्वे, प्रथिने इत्यादी) मुळातच अभाव असणे अशा रुग्णांमध्ये गुंतागुंत जास्त प्रमाणात दिसून येते. अशी गुंतागुंत होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे त्यामुळे डेंगू आजाराला घाबरु नये.

डेंगू संबंधीची तपासणी पॉसिटीव्ह आल्यावर देखील फक्त ताप आणि अंगदुखी असल्यास त्यासंबंधीची औषधे देऊन तुमचे डॉक्टर तुम्हाला घरी आराम करण्याचा सल्ला देऊ शकतात. डेंगूच्या सर्वच रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज भासत नाही. जे रुग्ण पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ (शुद्ध पाणी, स्वच्छ फळांचा जूस इत्यादी) उलट्या न होता घेऊ शकतात आणि ज्यांना चार- पाच तासांनी पुरेशा प्रमाणात लघवी होत असते, त्यांना ऍडमिट करावं लागत नाही. अशा वेळी मात्र घरी आराम करणे आणि सांगितलेल्या दिवशी तुमच्या डॉक्टरांना फॉलोअप ला भेटणे हे नितांत गरजेचे ठरते.

डेंग्यूचा प्रतिबंध(Prevention of Dengue):

घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वास्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत.

खिडक्यांना जाळ्या बसवून (स्क्रीनिंग करून) घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Have queries or concern ?

  About Author

  Dr. Pradeep Suryawanshi

  Dr. Madhav R. Dharme

  Consultant Physician Internal Medicine
  Contact: +91 88888 22222
  Email – [email protected]

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222